कॉलेजात असताना सिलॅबस मधे असलेली मॅनेजमेंटची व्याख्या अगदी तोंडपाठ होती माझी. येथे मुद्दाम “व्यवस्थापन” हा शब्द न वापरता “मॅनेजमेंट” हा शब्द वापरला आहे कारण “व्यवस्थापन” ह्या शब्दाला “मॅनेजमेंट” इतकं फेम नाहीये.
तर मी शिकलेली मॅनेजमेंट ची व्याख्या खालीलप्रमाणे,
मॅनेजमेंट म्हणजे, उपलब्ध असतील त्या लोकांकडून काम करवून घेणे
आता कॉलेज सोडून बरेच दिवस झालेत आणि नोकरीतही समज यावी इतका अनूभव आलाय. पण आता ह्या क्षणी जर मी परत वळून मॅनेजमेंटची ती व्याख्या आठवतो तेव्हा मला ती व्याख्या काहिशी अपूर्ण वाटते. बरेच कर्मचारी नोकरी सोडण्याचं कारण मानसिक समाधान नसणे हे सांगतात. बर्याचदा कर्मचार्यांना कंपनी हवीशी वाटते आणि मॅनेजर्स नकोसे वाटतात. बदलत्या काळानूसार मॅनेजमेंटची व्याख्या फक्त लोकांकडून काम करवून घेणे एवढीच मर्यादित न राहता, लोकाना त्यांच्या कामाप्रमाणे मानसिक आणि आर्थिक लाभ मिळ्तोय की नाही हे पाहणेही त्यात समाविष्ट असावे असे वाटते. अर्थात बरेच मॅनेजर तसं वागण्याचा नाहितर कमीत कमी तसं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण शेवटी जे फलित निघतं त्यानूसार मॅनेजमेंटची व्याख्या काहीशी खालिलप्रमाणे होते,
मॅनेजमेंट म्हणजे, जे मॅनेजर करतात ते
प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच, तसे काही मॅनेजर्स कर्मचार्यांच्या अपेक्षेस पुर्ण उतरतात देखिल. पण तरीही ढोबळमाणाने मॅनेजमेंटची ऐशी तैशी होतानाच जास्त दिसते.
कारणीमांसाः
कंपन्यांमधे जे गवताच्या मुळाजवळ (Grass Root Level) काम करतात ते फर्स्ट लेवल मॅनेजर्स (सुपरवायझर्स, टिम लीडर्स, इ.) क्वचितच मॅनेजमेंटचे धडे शिकलेले असतात. सामन्यतः फर्स्ट लेवल मॅनेजर्स हे स्वतः कामातुन अनुभव घेत प्रमोट होऊन मॅनेजर झालेले असतात. त्यांनी कुठेही मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं नसतं. ते त्यांच्या मॅनेजर्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन गावठी मॅनेजमेंटचा वारसा चालवताना दिसतात. पण याचा अर्थ हा होत नाही की मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेले मॅनेजर्स चांगले असतात. दोन्हीही प्रकारच्या मॅनेजर्सनी काही मुद्दे लक्षात घेतले तर कदाचित ते यशस्वी आणि कर्मचार्यांचे आवडते मॅनेजर्स होऊ शकतात.
माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे मी काही मुद्दे मांडतोः
१. कर्मचार्यांच्या कंपनिकडून फक्त दोन अपेक्षा असतात,
अ. आर्थिक समाधान
ब. मानसिक समाधान
मी बरेच कर्मचारी पाहिलेत की ते वरच्या कुठल्याही एका मुद्यासाठी दुसर्या मुद्याचा त्याग करायला तयार होतात. याचा अर्थ जर मॅनेजर या दोन्ही मुद्यांचा योग्य तो ब्लेंड साधु शकले तर कर्मचारी त्याना आणि कंपनीला सोडुन कधीच जाणार नाही.
२. जेव्हा कर्मचारी काही उत्कृष्ट कामगिरी पार पाडतात तेव्हा त्यांना त्याचं योग्य ते पारितोषिक मिळायला हवं. बरेच मॅनेजर्स ह्या मुद्याविषयी जागरुक असतात. पण त्यांची उत्कृष्टतेची व्याख्या काहितरी वेगळीच असते, त्यांना उत्कृष्टतेत WOW फिल हवं असतं. पण ह्याचवेळी ते विसरतात की असेही काहि कर्मचारी असतात की जे नित्याने त्यांच काम चोख पार पाडतात. बर्याचदा त्यांच्या कामात WOW फिल नसतं पण त्यांच्या कामात सातत्य असतं आणि ते खुप महत्वाचं आहे. आणि जर मॅनेजर त्यांच्या ह्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत असतील तर याने कर्मचार्यांचा परफॉरमन्स डाऊन होऊ शकतो. आणि सहाजिकच मॅनेजर अपयशी होऊ शकतो.
३. मॅनेजर्सनी कर्मचार्यांना नेहमिच भविष्यात तो कुठे असेल आणि त्यासाठी त्याला काय करावे लागेल हे सागायला हवे. ह्यालाच गोल / माईलस्टोन सेटींग असेही म्हणतात. बरेच मॅनेजर्स हा मुद्दा वापरताना दिसतात. पण काही अंशी ते त्यामध्ये वास्तवता आनण्यात अयशस्वी होतात. याला कर्मचारी उपहासाने “गाजर दाखवणे” असे म्हणतात. जर मॅनेजर्स ह्या मुद्याला यशस्वीपणे हातळू शकलेत तर यश त्यांच्या पायात लोटांगण घालेल.
४. खर्याखुर्या सुशिक्षित होत चाललेल्या आजच्या समाजाला त्यांची योग्यता माहीत असते. त्यामुळे मॅनेजर्सनी कर्मचार्यांना त्यांच्या योग्यतेनुसार योग्य ती वागणूक द्यायला हवी. बरेचदा मॅनेजर्स कर्मचार्याना गुलामासारखी वागणुक देताना दिसतात. पण मॅनेजर्सनी हे विसरायला नको की त्यांचे कर्मचारीही त्यांच्याईतकी किंवा त्यांच्याहीपेक्षा अधिक शैक्षणिक अहर्ता बाळगून आहेत.
५. सगळेच कर्मचारी सृजनशिल (Creative) असतात फक्त त्यांना त्यांच्या कामात स्वातंत्र्य मिळायला हवं. कारण सृजनशिलता ही स्वातंत्र्यात सामावलेली असते. आणि सृजनशिल डोक्यातुनच नविन कल्पना बाहेर येतात आणि ह्याच नविन कल्पना यशाची उत्तुंग शिखरे गाठतात. मॅनेजर्सनी फक्त त्यांच्या कर्मचार्यांना आवश्यक तेवढं स्वातंत्र्य द्यायला हवं.
६. कर्मचार्यांच्या परफॉर्मन्समध्ये सुधारना किंवा सातत्य असनं हे मॅनेजर्सच यश असतं. आणि यासाठी कर्मचार्यांनी कामाव्यतिरिक्त आवश्यक तेवढा वेळ आपल्या परिवारासोबत किंवा आपल्या विविध छंदांसाठी काढायला हवा. आणि ह्यासाठी मॅनेजर्सनी कर्मचार्यांना आवश्यक तेवढा वेळ मिळेल याची काळजी घ्यायला हवी.
सध्यातरी मला वरिल मुद्दे आवश्यक वाटत आहेत. कदाचित यात काही मुद्दे वास्तवात येण्यास अशक्य असतील किंवा चुकिचे असतील पण ते नुकसान कारक निश्चितच नसतील असं मला वाटतं.
तुम्हाला काय वाटतं?
