कट्टा


          प्रत्येकाने आपल्यासाठी एक अशी हक्काची जागा राखून ठेवलेली असते की जिथे गेल्यावर तो स्वतःशी संवाद साधतो. तो जेव्हा निराश होतो, दु:खी होतो किंवा त्याला काही विचार करायचा असतो तेव्हा तो त्या आवडत्या कट्ट्यावर जाऊन बसतो. आता माझ्यासाठी असं ठिकाण म्हणजे आमच्या घराची गच्ची. आसपासची अनोळखी गर्दी, आपली माणसे, आपण जमा केलेल्या वस्तू, या सार्‍यांनी आपलं सभोवताल अशा विचित्र पद्धतीने गुरफटलेलं असतं की आपल्याला आपण दिसतच नाही. मग कुठून साधणार संवाद? कधीकधी हे सारं अनावर होतं आणि आपण आपोआपच जाऊन पोहोचतो त्या आपल्या कट्ट्यावर. स्वत:शी मनमुराद गप्पा मारायला.

          मग सुरुवात होते ती स्वतःच्या ओळखीपासून, जसं काही आपण स्वत:ला ओळखतच नाही. आपला आपल्याच मनात असलेला एक चेहरा समोर येतो. जशी-जशी ओळख पूर्ण होत जाते तसा-तसा चेहरा पूर्ण होत जातो. मग कळतं अरे इतके दिवस समाजात वावरणारा ‘मी’ असा दिसतो? आपल्याला आधीच वेगवेगळ्या नात्यांनी वेगवेगळी ओळख दिलेली असते. आईसाठी आपण एक छोटसं बाळ असतो जे कितीही मोठं झालं तरी तिला वाटत असतं कि तिच्याविना पुढच्याच क्षणी ते धरपडणार आहे, बाबांसाठी आपण एक कच्च मडकं असतो जे अजून जीवनाच्या विविध धक्यांनी पक्क झालेलं नाहीये, दादासाठी आपण अगदीच मुर्ख बालक असतो ज्याला कुणीही वेडं बनवून जाईल, इ. पण आपल्या कट्ट्यावर आल्यावर हे सगळे बाह्य मुखवटे गळून पडतात आणि आपल्याला ‘आपण’ दिसतो.

          मी माझ्या कट्ट्यावर आल्यावर वेगवेगळ्या विषयांवर स्वतःशी गप्पा मारतो. आणि अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीने मी स्वतःशी प्रत्येक बाबतीत सहमत होतो. मित्रांशी गप्पा हाकताना मात्र हा प्रकार वेगळा असतो. तिथे जवळपास सगळेच माझ्या विचारांशी असहमत असतात किंवा मी त्यांच्या विचारांशी. म्हणूनच कि काय मी मित्रांपेक्षा माझ्या ह्या कट्ट्यावर जास्त रमतो. इथे मला उगाच कसला आव आणायची गरज नसते. इथे ‘मी’ अत्यंत नितळ स्वरूपातला ‘मी’ असतो.

          कधीकधी ह्या कट्ट्यावर गेल्या आयूष्याचा मागोवाही घेतला जातो. किती माणसे आपल्याला भेटली? किती सोडून गेलीत आणि कितीतरी अजूनही काही घट्ट अनुबंधांनी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कुणाला आपण दुखावले, कुणी आपल्याला दुखावले, सगळं सगळं बाहेर येतं. आपण केलेल्या चूका आपल्याला कळतात. आपण मिळवलेलं यश आठवतं आणि आपल्या पदरी पडलेलं अपयशही. मग या सगळ्या गोष्टींच पृथक्करण होऊन एक ‘अहवाल’ आपल्या समोर सादर होतो आणि तो म्हणजे ‘अनुभव’. मला नेहमी वाटतं आलय की आपण गेल्या आयुष्यात ज्या घटना जगलोय त्यांचा ‘अनुभव’ होण्याकरता आपला स्वतःशी संवाद होणं खुप आवश्यक असतं.

          मला माझा कट्टा असं भरभरुन देतो आणि मी दोन्ही हात पसरुन ते घेत जातो. असा हा माझा गच्चीरुपी कट्टा माझा जिवलग आहे. पण आमच्या वाडीतल्या हिरवे काकांना त्यांचा कट्टा कोणता आहे असे विचारल्यावर ते म्हणतात, “पिंपळाचं झाड”. मस्त दाट सावलीत थंडगार हवेत ते ‘तिला’ घेऊन पिंपळाच्या झाडावर बसतात. आता येथे गैरसमज नको म्हणून सांगतो, ‘ति’ म्हणजे ५ रुपयात भरभरुन मिळणारी ‘गावठी’. जेव्हा-जेव्हा हिरवे काकाचं हिरवे काकूंशी भांडण होतं तेव्हा-तेव्हा ते त्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतात. आणि यथेच्छ शिव्या हासडत ‘ति’चा लुफ्त उठवतात. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतात तेव्हा ते पुन्हा रिचार्ज झालेले असतात, नव्या भांडणासाठी. :)

          तुमच्याकडेही असा कट्टा असेल तर जरुर सांगा. तुमचाही कट्टा तुम्हाला रिचार्ज करतो का? कि तुम्ही वहावत जाता जुन्या आठवणींकडे? काय होतं तुमच्या कट्ट्यावर?

          नक्की कळवा.

- मंगेश खैरनार

मी जिवंत आहे


सारे विवाद टाळून,
मी आपला अलिप्त,
म्हणतो फुशारकीने,
मी तटस्थ आहे

संवाद ना कुणाशी,
मी नेहमीच मुक,
म्हणतो फुशारकीने,
चिंतन करतो आहे

चिडलो ना कधीही,
मी नेहमीच शांत,
म्हणतो फुशारकीने,
माफ केलं आहे

सारे लढून मेले,
मी नेहमी निशस्र
म्हणतो फुशारकीने,
मी जिवंत आहे

- मंगेश खैरनार

मन


मन तरुण तरुण,
उंच नभात शिरुन,
घेई भरारी उत्तुंग,
जणू आकाशी विहंग

मन पाकळी पाकळी,
भावनांची साखळी,
होता आठव-साठव,
भासे बहुरंगी ताटव

मन सारंगी सारंगी,
सूर तिचे सप्तरंगी,
कुणी छेडता तार,
प्रेम-संगीत अलवार

मन पाऊस पाऊस,
धारे धारेत जल्लोश
चिंब भिजून अंतर,
तव अंकुरे विचार

खरच वाटतं आता


आभाळाला भिडून जेव्हा,
ढग जमिनीवर येतात.
बरस-बरस बरसून,
मन मोकळं करतात.

खरच वाटतं आता,
असं असावं कुणीतरी.
यश-अपयश, ठेच-झेप,
ऐकून घ्यावं कुणीतरी.

चंद्र येतो आकाशात,
रात्रिच्या सोबतीला.
चांदण्याची उधळण होते,
गुजगोष्टी संगतीला.

खरच वाटतं आता,
असं असावं कुणीतरी,
हातात हात, मंद पाऊलवाट,
नजर असावी क्षितीजावरी.

मॅनेजमेंटची ऐशी तैशी


‎कॉलेजात असताना सिलॅबस मधे असलेली मॅनेजमेंटची व्याख्या अगदी तोंडपाठ होती माझी. येथे मुद्दाम “व्यवस्थापन” हा शब्द न वापरता “मॅनेजमेंट” हा शब्द वापरला आहे कारण “व्यवस्थापन” ह्या शब्दाला “मॅनेजमेंट” इतकं फेम नाहीये.

तर मी शिकलेली मॅनेजमेंट ची व्याख्या खालीलप्रमाणे,

मॅनेजमेंट म्हणजे, उपलब्ध असतील त्या लोकांकडून काम करवून घेणे

आता कॉलेज सोडून बरेच दिवस झालेत आणि नोकरीतही समज यावी इतका अनूभव आलाय. पण आता ह्या क्षणी जर मी परत वळून मॅनेजमेंटची ती व्याख्या आठवतो तेव्हा मला ती व्याख्या काहिशी अपूर्ण वाटते. बरेच कर्मचारी नोकरी सोडण्याचं कारण मानसिक समाधान नसणे हे सांगतात. बर्‍याचदा कर्मचार्‍यांना कंपनी हवीशी वाटते आणि मॅनेजर्स नकोसे वाटतात. बदलत्या काळानूसार मॅनेजमेंटची व्याख्या फक्त लोकांकडून काम करवून घेणे एवढीच मर्यादित न राहता, लोकाना त्यांच्या कामाप्रमाणे मानसिक आणि आर्थिक लाभ मिळ्तोय की नाही हे पाहणेही त्यात समाविष्ट असावे असे वाटते. अर्थात बरेच मॅनेजर तसं वागण्याचा नाहितर कमीत कमी तसं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण शेवटी जे फलित निघतं त्यानूसार मॅनेजमेंटची व्याख्या काहीशी खालिलप्रमाणे होते,

मॅनेजमेंट म्हणजे, जे मॅनेजर करतात ते

प्रत्येक गोष्टीला अपवाद असतातच, तसे काही मॅनेजर्स कर्मचार्‍यांच्या अपेक्षेस पुर्ण उतरतात देखिल. पण तरीही ढोबळमाणाने मॅनेजमेंटची ऐशी तैशी होतानाच जास्त दिसते.

कारणीमांसाः

कंपन्यांमधे जे गवताच्या मुळाजवळ (Grass Root Level) काम करतात ते फर्स्ट लेवल मॅनेजर्स (सुपरवायझर्स, टिम लीडर्स, इ.) क्वचितच मॅनेजमेंटचे धडे शिकलेले असतात. सामन्यतः फर्स्ट लेवल मॅनेजर्स हे स्वतः कामातुन अनुभव घेत प्रमोट होऊन मॅनेजर झालेले असतात. त्यांनी कुठेही मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं नसतं. ते त्यांच्या मॅनेजर्सच्याच पावलावर पाऊल ठेऊन गावठी मॅनेजमेंटचा वारसा चालवताना दिसतात. पण याचा अर्थ हा होत नाही की मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेले मॅनेजर्स चांगले असतात. दोन्हीही प्रकारच्या मॅनेजर्सनी काही मुद्दे लक्षात घेतले तर कदाचित ते यशस्वी आणि कर्मचार्‍यांचे आवडते मॅनेजर्स होऊ शकतात.

माझ्या अल्प ज्ञानाप्रमाणे मी काही मुद्दे मांडतोः

१. कर्मचार्‍यांच्या कंपनिकडून फक्त दोन अपेक्षा असतात,

अ. आर्थिक समाधान

ब. मानसिक समाधान

मी बरेच कर्मचारी पाहिलेत की ते वरच्या कुठल्याही एका मुद्यासाठी दुसर्‍या मुद्याचा त्याग करायला तयार होतात. याचा अर्थ जर मॅनेजर या दोन्ही मुद्यांचा योग्य तो ब्लेंड साधु शकले तर कर्मचारी त्याना आणि कंपनीला सोडुन कधीच जाणार नाही.

२. जेव्हा कर्मचारी काही उत्कृष्ट कामगिरी पार पाडतात तेव्हा त्यांना त्याचं योग्य ते पारितोषिक मिळायला हवं. बरेच मॅनेजर्स ह्या मुद्याविषयी जागरुक असतात. पण त्यांची उत्कृष्टतेची व्याख्या काहितरी वेगळीच असते, त्यांना उत्कृष्टतेत WOW फिल हवं असतं. पण ह्याचवेळी ते विसरतात की असेही काहि कर्मचारी असतात की जे नित्याने त्यांच काम चोख पार पाडतात. बर्‍याचदा त्यांच्या कामात WOW फिल नसतं पण त्यांच्या कामात सातत्य असतं आणि ते खुप महत्वाचं आहे. आणि जर मॅनेजर त्यांच्या ह्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत असतील तर याने कर्मचार्‍यांचा परफॉरमन्स डाऊन होऊ शकतो. आणि सहाजिकच मॅनेजर अपयशी होऊ शकतो.

३. मॅनेजर्सनी कर्मचार्‍यांना नेहमिच भविष्यात तो कुठे असेल आणि त्यासाठी त्याला काय करावे लागेल हे सागायला हवे. ह्यालाच गोल / माईलस्टोन सेटींग असेही म्हणतात. बरेच मॅनेजर्स हा मुद्दा वापरताना दिसतात. पण काही अंशी ते त्यामध्ये वास्तवता आनण्यात अयशस्वी होतात. याला कर्मचारी उपहासाने “गाजर दाखवणे” असे म्हणतात. जर मॅनेजर्स ह्या मुद्याला यशस्वीपणे हातळू शकलेत तर यश त्यांच्या पायात लोटांगण घालेल.

४. खर्‍याखुर्‍या सुशिक्षित होत चाललेल्या आजच्या समाजाला त्यांची योग्यता माहीत असते. त्यामुळे मॅनेजर्सनी कर्मचार्‍यांना त्यांच्या योग्यतेनुसार योग्य ती वागणूक द्यायला हवी. बरेचदा मॅनेजर्स कर्मचार्‍याना गुलामासारखी वागणुक देताना दिसतात. पण मॅनेजर्सनी हे विसरायला नको की त्यांचे कर्मचारीही त्यांच्याईतकी किंवा त्यांच्याहीपेक्षा अधिक शैक्षणिक अहर्ता बाळगून आहेत.

५. सगळेच कर्मचारी सृजनशिल (Creative) असतात फक्त त्यांना त्यांच्या कामात स्वातंत्र्य मिळायला हवं. कारण सृजनशिलता ही स्वातंत्र्यात सामावलेली असते. आणि सृजनशिल डोक्यातुनच नविन कल्पना बाहेर येतात आणि ह्याच नविन कल्पना यशाची उत्तुंग शिखरे गाठतात. मॅनेजर्सनी फक्त त्यांच्या कर्मचार्‍यांना आवश्यक तेवढं स्वातंत्र्य द्यायला हवं.

६. कर्मचार्‍यांच्या परफॉर्मन्समध्ये सुधारना किंवा सातत्य असनं हे मॅनेजर्सच यश असतं. आणि यासाठी कर्मचार्‍यांनी कामाव्यतिरिक्त आवश्यक तेवढा वेळ आपल्या परिवारासोबत किंवा आपल्या विविध छंदांसाठी काढायला हवा. आणि ह्यासाठी मॅनेजर्सनी कर्मचार्‍यांना आवश्यक तेवढा वेळ मिळेल याची काळजी घ्यायला हवी.

सध्यातरी मला वरिल मुद्दे आवश्यक वाटत आहेत. कदाचित यात काही मुद्दे वास्तवात येण्यास अशक्य असतील किंवा चुकिचे असतील पण ते नुकसान कारक निश्चितच नसतील असं मला वाटतं.

तुम्हाला काय वाटतं?

एका सामान्य माणसाचं असामान्य स्वप्न आहेस तु


एका सामान्य माणसाचं असामान्य स्वप्न आहेस तु,
कदाचित नसेल आपला आलिशान बंगला किंवा डौलदार घर,
पण प्रेमाची जाण आणि स्वाभिमानाची शान नक्कीच दिसेल तुला,
तुला दिसतील तुझ्या सख्या ऐश्वर्य उपभोगताना,
पण माझ्याकडे दिड दमडी नसताना देखिल, हरवू देणार नाही तुझ्या गालावरचं हसू,
कारण? कारण एका सामान्य माणसाचं असामान्य स्वप्न आहेस तु
आयुष्यात अनेक प्रतिकुल परिस्थिती येतील ज्यावेळी मला तुझी साथ हवी असेल,
हरेलही मी बरेचसे डाव, पण माझा हात कधिच सोडू नकोस,
तेव्हा तुझं माझ्या सोबत असणं हाच माझा विजय असेल,
जग म्हणेल मला गरिब–दरिद्री, तु अजिबात तिकडे लक्ष द्यायचं नाहीस,
कारण? कारण एका सामान्य माणसाचं असामान्य स्वप्न आहेस तु
सुख-दुख म्हणता म्हणता आयुष्य संपत जाईल,
मी नेहमिच असेल तुझ्या सोबत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
आणि एक दिवस तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मी निघून जाईन हे जग सोडून,
पण सोबत देऊन जाईन जन्मभराच्या आठवणींचा ठेवा, तुला हसवण्यासाठी,
कारण? कारण त्यावेळी एका असामान्य माणसाचं असामान्य स्वप्न असशिल तु

झाडूचं राजकारण


जीवन शिक्षण विद्यामंदिर

टण..टण..टण..टण..
शाळेचा गजर झाला तसे आम्ही धावत पटांगणात हजर झालो. मी, लल्या, पंक्या आणि आब्या आम्ही सगळेचं आज खुप घाबरलेलो होतो. आम्हाला नेमण्यात आलेला शाळेच्या पटांगणाचा भाग आज शाळेत लवकर येवून देखिल साफ झालेला नव्हता. (होय, त्यावेळच्या आमच्या जीवन शिक्षण विद्यामंदिरात शिपाई वगैरे नसत, सारं काम आम्हा मुलांनाच वाटलेलं असायचं.)
तर आज लवकर शाळेत जमून देखिल आम्ही आमच्या वाट्याला असलेलं पटांगण साफ करू शकलो नव्हतो. कारण काय तर झाडूंचा तुटवडा. खरं पाहता प्रत्येक वर्गाला स्वतःचे असे ४ झाडू शाळेने उपलब्ध करुन दिलेले होते, पण नेमूण दिलेलं पटांगण लवकर साफ करता यावं म्हणून झाडूंची पळवापळवी चालायची. आणि आज नेमकं तेच संकट आमच्यावर ओढवलं होतं. आमच्या वर्गाचे २ झाडू आधिच कुणीतरी पळवले होते आणि उरलेले दोन आमच्याही आधी आलेल्या आमच्या वर्गमित्रांनी बळकावले होते. आता काय करणार ह्या विचारात असतानाच लल्याच्या सुपिक डोक्यातून एक विचार आला आणि घाईतच तो मला म्हणाला,

“मंग्या, आपण फक्त झाडू मारल्याचे निशाण बनवू पटांगणावर, असही सारं साफच दिसतयं!”

मग काय, आम्ही सार्‍यांनी लल्याची पाठ थोपटली आणि चार पाच काड्या जमवून झाडू मारल्यासारखे निशाण बनवू लागलो. रोज आम्हाला पटांगण साफ करायला २० मिनिटे लागायची, पण निशाण बनवायला आम्हाला फक्त ५ मिनिटं लागली. आता सारं व्यवस्थित झालं होतं. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला तेवढ्यात कुणीतरी माझ्या पाठीवर थाप देवून म्हणालं,

“मंग्या मी पाहिलयं सगळं, सांगतो गुरुजींना थांब!”

मी दचकलोच, मागे वळून पाहिलं तर ४ थी ‘क’ चा किश्या होता. मी शाळेत किश्या सोडून कुणालाच घाबरत नसे, आणि आज नेमका त्याच्याच हाताला गावलो होतो. किश्याला घाबरण्याला कारणही तसच होतं, आणि ते म्हणजे त्याची आजी. हो, त्याची आजी म्हणजे फारच भांडखोर होती. किश्याला कुणी मारलं-ओरडलं तर तो त्याच्या आजीला घेऊन घरी हजर व्हायचां आणि मग त्याची आजी यथेच्च शिव्या देत सगळी गल्ली अंगावर घ्यायची. आणि मग घरच्यांकडून भरपेट मार पडायचा. मी किश्याच्या गयावया करून त्याला समजावू लागलो,

“किश्या अरे आम्हाला आज झाडूचं मिळाला नाहीरे म्हणून मग आम्ही…”

पण किश्या ऐकायला थांबला होता कुठे. तो धावतच वर्गाकडे निघून गेला आणि तेवढ्यात शाळेचा गजर झाला.

प्रार्थना सुरु असताना गुरुजी सारं पटांगण फिरुन आले. अजुन तरी गुरुजींच्या चेहर्‍यावर काही वेगळे भाव दिसत नव्हते. म्हणजे आमची शाळा यशस्वी झाली होती. आता फक्त भिती होती ती किश्याची, त्याने गुरुजींना सांगितलं नाही म्हणजे झालं. पंक्या आणि आब्या किश्याचाच शोध घेत होते. पण तो बुटका असल्यामूळे ओळीच्या सुरवातीलाच उभा होता आणि आम्ही बरेच मागे होतो. असही ४ थी ‘क’ आणि ४ थी ‘ब’ च्या मुलांचं एकमेकांशी कधीच जमत नसे, आणि आज तर त्यांच्या हाती कोलीतच सापडलं होतं म्हटल्यावर एकूणच आमची काही खैर नव्हती. प्रार्थना संपली आणि गुरूजींनी ४ थी ‘क’ च्या मुलांच्या उनाडक्यांचा पाढा वाचण्यास सुरवात केली आणि त्यांना कडक सुचना देण्यात आली की यापूढे त्यांचा आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही. हे सारं ऐकलं आणि आमच्या जिवात जिव आला. एवढं रागवल्यावर निदान आता पटांगणावर तरी किश्या आणि सवंगडी आमची तक्रार करणार नाहीत हे नक्की होतं. फक्त आता चिंता होती ती त्यांचे वर्गशिक्षक शिवराम गुरुजी यांची. ४ थी ‘क’ चे वर्गशिक्षक म्हणजेच शिवराम गुरुजी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा देत. आणि किश्या वर्गात गेल्यावर नक्कीच गुरूजींना झाला प्रकार सांगणार ही काळ्या दगडावरची रेष होती. तेवढ्यात पुन्हा लल्याच्या सुपिक डोक्यातून एक कल्पना बाहेर आली. तो म्हणाला,

“मित्रांनो, आपण पटांगणावर झाडू मारला नाही आणि फक्त निशाण बनवले, हे फक्त आणि फक्त किश्यानेच पाहिलयं”

“अरे पण त्या एकट्याने पाहणच पुरेसं आहे आपली वाट लावायला”, मी मधेच म्हणालो.

“मित्रा, आपण त्यांचे झाडू पळवले तर??? त्याचे सगळेच झाडू कुठेतरी लपवूया आणि शिवराम गुरुजी आल्यावर त्यांना सांगूया की आम्ही तर खरच झाडू मारलाय पटांगणावर, उलट किश्या आणि सवंगडी यानी निशाण बनवलेत फक्त”, लल्या उत्तरला.

आमच्या सगळ्यांच्या ट्युब आता पेटल्या होत्या. मग पंक्या आणि आब्यावर झाडू पळवायची कठीण जबाबदारी सोपवण्यात आली. आणि बघता बघता नजर चुकवत ते झाडू घेऊन हजर झाले. आम्ही ते झाडू घेऊन कसेबसे आमच्या वर्गात नेणार तेवढ्यात मी सगळ्यांना मागे ओढलं आणि हळूच म्हणालो,

“अरे आपल्या वर्गात कुठे नेतायत, आपल्या वर्गात झाडू सापडले तर आपली चोरी पकडली जाईल… एक काम करुया सगळे झाडू ४ थी ‘अ’ च्या वर्गात लपवूया”

“काय हुषार आहेस रे मंग्या तू, असही ती ४ थी ‘अ’ ची पिंकी खुप शहाणपणा करते, येऊ़दे आलं तर तिचं नावं”, लल्याने मला पाठिंबा दिला.

झाडू ४ थी ‘अ’ च्या वर्गात लपवून आम्ही आमच्या वर्गात येऊन निर्धास्त बसलो.

तासाभरात शिवराम गुरुजी आणि त्यांची पलटण किश्याच्या पाठीमागे आमच्या वर्गात दाखल झाली. गुरुजी हेच ते म्हणत किश्याने आमच्याकडे अंगुलीनिर्देश केला. आम्ही चौघानी सात्वीक चेहरे करुन ”काय गुरुजी?” म्हणून विचारलं.

“काय रे झंप्यांनो, पटांगण साफ करायला त्रास होतो होय रे तुम्हाला, फक्त निशाणी बनवतात म्हणे तुम्ही” गुरुजी कडाडले.

तेवढ्यात आमच्या गुरुजींनी पुढाकार घेतला आणि मला विचारलं,

“काय रे मंगेश, काय म्हणताय गुरुजी?”

“गुरुजी तो किश्या अअ किशोर खोट बोलतोय, उलट त्यांनीच पटांगण साफ केलं नाहीये आणि फक्त निशाण बनवलेत”, मी हळव्या स्वरात म्हणालो.

“हे तु कशावरुन सांगतोयस की किशोर खोटं बोलतोय ते?”, शिवराम गुरुजींनी थेट मलाच विचारलं.

“वाटल्यास ४ थी ‘क’ च्या वर्गात जाऊन बघा, त्यांच्याकडे एकही झाडू नाहीये आणि म्हणूनच त्यानी पटांगण साफ न करता फक्त निशाण बनवलेत”, मी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणालो.

“गुरुजी आधी यांच्या वर्गाचे बघा, यांच्याकडे आहेत का झाडू?”, किश्याने उलट सवाल केला.

मला माहीत होतं की आमच्या वर्गात दोन झाडू आहेत. आमचे गुरुजी कपाटाकडे गेले आणि तिथेच उभे राहीले. मग सगळेच पहायला म्हणून कपाटापाशी जमा झाले. आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आमच्या कपाटात एकही झाडू नव्हता. आमची फजिती झाली होती. पण तरीही आम्ही अजून हरलो नव्हतो कारण ४ थी ‘क’ चे झाडू तपासायचे अजून बाकी होते. आमचे गुरुजी आमच्याकडे डोळे विस्फारुन बघत होते. आम्हाला कळलं होतं आता आमची काही खैर नाही ते. पण उगाच उसणं बळ आणून आम्ही गुरुजींसोबत ४ थी ‘क’ च्या वर्गात गेलो. किश्याने त्याच्या चेहर्‍यावर मोठे निरागस भाव आणलेले दिसत होते. शिवराम गुरुजींनी कपाट उघडलं आणि त्यातून ४ झाडू खाली पडले. आमच्या गुरुजींनी आम्हा चौघांचे हात पकडले आणि चोपतच आम्हाला आमच्या वर्गापर्यंत नेले. आणि सगळ्या वर्गासमोर आमची चांगलीच पुजा मांडली.

५ विच्या वर्गात गेल्यावर पिंकी माझ्याच वर्गात आली. एके दिवशी डबा खाताना तिनेच मला सांगितलं की कसं तिने ते झाडू परत जावून ४ थी ‘क’ च्या वर्गात ठेवले होते, आम्हाला अद्दल घडवण्यासाठी.

हाय याद, तुझी याद


तरंगतात भावना ओल्या ह्रुदयात,
मनाचिये डोही खोलवर डुंबतात
सावल्यांचा खेळ चाले नयनपटलात,
आठवांची चलचित्रे बंद लोचनात

शब्द होती रिते तुझ्या स्मरणात,
अस्वस्थाची आंदोलणे अंतर्मनात,
सांज होते बावरी कातरक्षणांत,
हळवी एकाकी कण्हते चांदरात

हाय याद, तुझी याद.

चालणारे आणि धावणारे


चालणारे आणि धावणारे असे दोन गट असतात. धावणारे खुप लांबचा पल्ला गाठतात पण, धावताना सभोवताली काय घडतय? आपल्या सोबत कोण आहे? कोण मागे पडलय? ह्या गोष्टीकडे ते अजिबात लक्ष देत नाहीत, किंबहूना देऊ शकत नाहीत. याऊलट चालणारे सहजगत्या पाहतात, सभोवताली काय घडतय? आपल्या सोबत कोण आहे? कोण मागे पडलय? पण चालणारे जास्त लांबचा पल्ला गाठू शकत नाहीत. दोन्ही गटात आपण काही ना काही मुकतोच, आता हे आपलं आपण ठरवायचं कशाला मुकायचं आणि काय मिळवायचं ते.

- (विचारात मग्न) मंगेश :)

ते म्हणतात


ते म्हणतात स्वप्ने पाहू नकोस,
स्वप्ने खरी होत नसतात,
पण त्यांना काय माहीत,
उगवत्या आशेला बांध नसतात

ते म्हणतात आयूष्य सोपं नाही,
खाच खळग्यांचा खडतर रस्ता आहे,
पण त्यांना काय माहीत,
ह्या गरुडाच्या डोळ्यात आभाळ आहे