टण..टण..टण..टण..
शाळेचा गजर झाला तसे आम्ही धावत पटांगणात हजर झालो. मी, लल्या, पंक्या आणि आब्या आम्ही सगळेचं आज खुप घाबरलेलो होतो. आम्हाला नेमण्यात आलेला शाळेच्या पटांगणाचा भाग आज शाळेत लवकर येवून देखिल साफ झालेला नव्हता. (होय, त्यावेळच्या आमच्या जीवन शिक्षण विद्यामंदिरात शिपाई वगैरे नसत, सारं काम आम्हा मुलांनाच वाटलेलं असायचं.)
तर आज लवकर शाळेत जमून देखिल आम्ही आमच्या वाट्याला असलेलं पटांगण साफ करू शकलो नव्हतो. कारण काय तर झाडूंचा तुटवडा. खरं पाहता प्रत्येक वर्गाला स्वतःचे असे ४ झाडू शाळेने उपलब्ध करुन दिलेले होते, पण नेमूण दिलेलं पटांगण लवकर साफ करता यावं म्हणून झाडूंची पळवापळवी चालायची. आणि आज नेमकं तेच संकट आमच्यावर ओढवलं होतं. आमच्या वर्गाचे २ झाडू आधिच कुणीतरी पळवले होते आणि उरलेले दोन आमच्याही आधी आलेल्या आमच्या वर्गमित्रांनी बळकावले होते. आता काय करणार ह्या विचारात असतानाच लल्याच्या सुपिक डोक्यातून एक विचार आला आणि घाईतच तो मला म्हणाला,
“मंग्या, आपण फक्त झाडू मारल्याचे निशाण बनवू पटांगणावर, असही सारं साफच दिसतयं!”
मग काय, आम्ही सार्यांनी लल्याची पाठ थोपटली आणि चार पाच काड्या जमवून झाडू मारल्यासारखे निशाण बनवू लागलो. रोज आम्हाला पटांगण साफ करायला २० मिनिटे लागायची, पण निशाण बनवायला आम्हाला फक्त ५ मिनिटं लागली. आता सारं व्यवस्थित झालं होतं. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला तेवढ्यात कुणीतरी माझ्या पाठीवर थाप देवून म्हणालं,
“मंग्या मी पाहिलयं सगळं, सांगतो गुरुजींना थांब!”
मी दचकलोच, मागे वळून पाहिलं तर ४ थी ‘क’ चा किश्या होता. मी शाळेत किश्या सोडून कुणालाच घाबरत नसे, आणि आज नेमका त्याच्याच हाताला गावलो होतो. किश्याला घाबरण्याला कारणही तसच होतं, आणि ते म्हणजे त्याची आजी. हो, त्याची आजी म्हणजे फारच भांडखोर होती. किश्याला कुणी मारलं-ओरडलं तर तो त्याच्या आजीला घेऊन घरी हजर व्हायचां आणि मग त्याची आजी यथेच्च शिव्या देत सगळी गल्ली अंगावर घ्यायची. आणि मग घरच्यांकडून भरपेट मार पडायचा. मी किश्याच्या गयावया करून त्याला समजावू लागलो,
“किश्या अरे आम्हाला आज झाडूचं मिळाला नाहीरे म्हणून मग आम्ही…”
पण किश्या ऐकायला थांबला होता कुठे. तो धावतच वर्गाकडे निघून गेला आणि तेवढ्यात शाळेचा गजर झाला.
प्रार्थना सुरु असताना गुरुजी सारं पटांगण फिरुन आले. अजुन तरी गुरुजींच्या चेहर्यावर काही वेगळे भाव दिसत नव्हते. म्हणजे आमची शाळा यशस्वी झाली होती. आता फक्त भिती होती ती किश्याची, त्याने गुरुजींना सांगितलं नाही म्हणजे झालं. पंक्या आणि आब्या किश्याचाच शोध घेत होते. पण तो बुटका असल्यामूळे ओळीच्या सुरवातीलाच उभा होता आणि आम्ही बरेच मागे होतो. असही ४ थी ‘क’ आणि ४ थी ‘ब’ च्या मुलांचं एकमेकांशी कधीच जमत नसे, आणि आज तर त्यांच्या हाती कोलीतच सापडलं होतं म्हटल्यावर एकूणच आमची काही खैर नव्हती. प्रार्थना संपली आणि गुरूजींनी ४ थी ‘क’ च्या मुलांच्या उनाडक्यांचा पाढा वाचण्यास सुरवात केली आणि त्यांना कडक सुचना देण्यात आली की यापूढे त्यांचा आगाऊपणा खपवून घेतला जाणार नाही. हे सारं ऐकलं आणि आमच्या जिवात जिव आला. एवढं रागवल्यावर निदान आता पटांगणावर तरी किश्या आणि सवंगडी आमची तक्रार करणार नाहीत हे नक्की होतं. फक्त आता चिंता होती ती त्यांचे वर्गशिक्षक शिवराम गुरुजी यांची. ४ थी ‘क’ चे वर्गशिक्षक म्हणजेच शिवराम गुरुजी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा देत. आणि किश्या वर्गात गेल्यावर नक्कीच गुरूजींना झाला प्रकार सांगणार ही काळ्या दगडावरची रेष होती. तेवढ्यात पुन्हा लल्याच्या सुपिक डोक्यातून एक कल्पना बाहेर आली. तो म्हणाला,
“मित्रांनो, आपण पटांगणावर झाडू मारला नाही आणि फक्त निशाण बनवले, हे फक्त आणि फक्त किश्यानेच पाहिलयं”
“अरे पण त्या एकट्याने पाहणच पुरेसं आहे आपली वाट लावायला”, मी मधेच म्हणालो.
“मित्रा, आपण त्यांचे झाडू पळवले तर??? त्याचे सगळेच झाडू कुठेतरी लपवूया आणि शिवराम गुरुजी आल्यावर त्यांना सांगूया की आम्ही तर खरच झाडू मारलाय पटांगणावर, उलट किश्या आणि सवंगडी यानी निशाण बनवलेत फक्त”, लल्या उत्तरला.
आमच्या सगळ्यांच्या ट्युब आता पेटल्या होत्या. मग पंक्या आणि आब्यावर झाडू पळवायची कठीण जबाबदारी सोपवण्यात आली. आणि बघता बघता नजर चुकवत ते झाडू घेऊन हजर झाले. आम्ही ते झाडू घेऊन कसेबसे आमच्या वर्गात नेणार तेवढ्यात मी सगळ्यांना मागे ओढलं आणि हळूच म्हणालो,
“अरे आपल्या वर्गात कुठे नेतायत, आपल्या वर्गात झाडू सापडले तर आपली चोरी पकडली जाईल… एक काम करुया सगळे झाडू ४ थी ‘अ’ च्या वर्गात लपवूया”
“काय हुषार आहेस रे मंग्या तू, असही ती ४ थी ‘अ’ ची पिंकी खुप शहाणपणा करते, येऊ़दे आलं तर तिचं नावं”, लल्याने मला पाठिंबा दिला.
झाडू ४ थी ‘अ’ च्या वर्गात लपवून आम्ही आमच्या वर्गात येऊन निर्धास्त बसलो.
तासाभरात शिवराम गुरुजी आणि त्यांची पलटण किश्याच्या पाठीमागे आमच्या वर्गात दाखल झाली. गुरुजी हेच ते म्हणत किश्याने आमच्याकडे अंगुलीनिर्देश केला. आम्ही चौघानी सात्वीक चेहरे करुन ”काय गुरुजी?” म्हणून विचारलं.
“काय रे झंप्यांनो, पटांगण साफ करायला त्रास होतो होय रे तुम्हाला, फक्त निशाणी बनवतात म्हणे तुम्ही” गुरुजी कडाडले.
तेवढ्यात आमच्या गुरुजींनी पुढाकार घेतला आणि मला विचारलं,
“काय रे मंगेश, काय म्हणताय गुरुजी?”
“गुरुजी तो किश्या अअ किशोर खोट बोलतोय, उलट त्यांनीच पटांगण साफ केलं नाहीये आणि फक्त निशाण बनवलेत”, मी हळव्या स्वरात म्हणालो.
“हे तु कशावरुन सांगतोयस की किशोर खोटं बोलतोय ते?”, शिवराम गुरुजींनी थेट मलाच विचारलं.
“वाटल्यास ४ थी ‘क’ च्या वर्गात जाऊन बघा, त्यांच्याकडे एकही झाडू नाहीये आणि म्हणूनच त्यानी पटांगण साफ न करता फक्त निशाण बनवलेत”, मी मोठ्या आत्मविश्वासाने म्हणालो.
“गुरुजी आधी यांच्या वर्गाचे बघा, यांच्याकडे आहेत का झाडू?”, किश्याने उलट सवाल केला.
मला माहीत होतं की आमच्या वर्गात दोन झाडू आहेत. आमचे गुरुजी कपाटाकडे गेले आणि तिथेच उभे राहीले. मग सगळेच पहायला म्हणून कपाटापाशी जमा झाले. आमचा आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आमच्या कपाटात एकही झाडू नव्हता. आमची फजिती झाली होती. पण तरीही आम्ही अजून हरलो नव्हतो कारण ४ थी ‘क’ चे झाडू तपासायचे अजून बाकी होते. आमचे गुरुजी आमच्याकडे डोळे विस्फारुन बघत होते. आम्हाला कळलं होतं आता आमची काही खैर नाही ते. पण उगाच उसणं बळ आणून आम्ही गुरुजींसोबत ४ थी ‘क’ च्या वर्गात गेलो. किश्याने त्याच्या चेहर्यावर मोठे निरागस भाव आणलेले दिसत होते. शिवराम गुरुजींनी कपाट उघडलं आणि त्यातून ४ झाडू खाली पडले. आमच्या गुरुजींनी आम्हा चौघांचे हात पकडले आणि चोपतच आम्हाला आमच्या वर्गापर्यंत नेले. आणि सगळ्या वर्गासमोर आमची चांगलीच पुजा मांडली.
५ विच्या वर्गात गेल्यावर पिंकी माझ्याच वर्गात आली. एके दिवशी डबा खाताना तिनेच मला सांगितलं की कसं तिने ते झाडू परत जावून ४ थी ‘क’ च्या वर्गात ठेवले होते, आम्हाला अद्दल घडवण्यासाठी.

मस्त आहे!!!
आपल्या रुममध्ये तर झाडू नेहमीच असतो
तरीही जमल्यास
रूममध्येपण कमीतकमी झाडू मारल्यासारखे निशाण तरी बनवत जा
धन्यवाद मनोज
)
आणि हो, मी रोज झाडू मारतो रुममध्ये सकाळी ६ वाजता उठून (तुम्ही झोपलेले असतात तेव्हा