माझ्या मनात मी उभं केलयं,
एक शांततेचं मंदिर.
रोज तिथं शांततेची पारायणं चालतात,
पारायणं कसली….गोंगाट नुसता!
येणारा प्रत्येक विचार
मंदिराची पायरी चढुन, दर्शन घेऊन,
घंटानाद करुनच येतो!
मग मी मोठ्या लाचारीने,
तो शांततेने प्रवृत्त असा मिळमिळीत विचार
चघळत बसतो मनात!
आज जिथे मंदिर आहे,
तिथे कधीतरी तलवारी चालायच्या,
लक्तरे उडायची एकेका विचाराची,
घनाघाती प्रहार व्हायचे नुसते,
खण…खण…खण…
एक दिवस अचानक त्या तलवारी हरवल्या कुठेतरी
आणि एका योगिनीने शांततेची मुर्ति समोर केली.
म्हणाली, “मंदिर बनव, असही तु तलवारी हरवल्या आहेत”
मलाही ते पटलं, म्हटलं बनवू मंदिर सुरेख
आणि बनवलंही….
त्या मुर्तिचं तेज मात्र मला ओळखीचं वाटायचं नेहमी,
अगोदर अनुभवल्यासारखं!
खुप आठवायचा प्रयत्न केला, आठवेचना.
मग शेवटी त्या योगिनीलाच विचारलं,
ती म्हणाली, “तुझ्या तलवारी कुठे गेल्यात?
त्या वितळवूनच तर ही मुर्ति बनवलिये मी!”
मनात धस्स झालं!
अगदी त्या दिवसापासुन मी शोधतोय,
मुर्ति वितळवून तलवारी बनवणारं कुणीतरी!
Mar
19
2012
मंगेश तुझ्या शब्दांना आणि कल्पकतेला खरच तोड नाही …
“अगदी त्या दिवसापासुन मी शोधतोय,
मुर्ति वितळवून तलवारी बनवणारं कुणीतरी!”
असा विचार फक्त तूच करू शकतो … कारण लढणाऱ्या मनाला तू कधीच शांत करू शकत नाही ….
धन्यवाद सचिन.