यशस्वी कोण होतं?


   दैनदिन कामकाजात आपण इतके व्यस्त असतो की आपल्याला स्वतःविषयी विचार करायला वेळच मिळत नाही. मग त्यात आणखी खोलात जाऊन आपले ध्येय, आकांक्षा याविषयी विचार करण्यास वेळ कुणाकडे असणार? म्हणजेच माणूस त्याचे लाक्षणीक ध्येय जसे सरकारी कामे, कार्यालयीन कामे, जेवणे, झोपणे, इत्यादि पूर्ण करण्यातच सगळा वेळ वाया घालवतो. माणसेतर प्राणीही असंच काहीतरी करत असतात. त्यांनाही असे लाक्षणीक ध्येयच साध्य करायचे असतात. फक्त त्यांचे प्रकार थोडे वेगळे असतात. माणसेतर प्राण्यांना पोट भरणे हे काम अधिक महत्वाचे असते. मी आजपर्यंत कुठला असा माणसेतर प्राणी पाहिला नाही जो त्याच्या भविष्याचा विचार करुन काही कामे करत असेल (मुंगी या किटकासारखे अपवाद वगळता). मग माणसातला आणि इतर प्राण्यांतला फरक कुठे पहावयास मिळतो?
   असा फरक फक्त यशस्वी माणसांतच दिसतो. जी माणसे यशस्वी झालीत, ती काही एका दिवसात नव्हे, त्यामागे त्यांची बर्‍याच दिवसांची मेहनत असते. जेव्हा तुम्हा आम्हासारखी माणसे आजचा विचार करण्यात व्यस्त असतात, तेव्हा कुठेतरी अज्ञातवासात भावी यशस्वी माणसे त्यांच्या भविष्याचा विचार करण्यात गर्क असतात. आणि एक दिवस अचानक आपल्यातलाच कुणीतरी या यशस्वी माणसांच्या पंक्तीत जाऊन बसलेला आपल्याला दिसतो.
   मग सगळेच विचार करणारे यशस्वी होतात काय? नाही. ज्यांच्या विचारांना योग्य आचरणाची साथ मिळते तेच लोक यशस्वी होतात.
   खालील ४ प्रमुख मुद्दे जे यशस्वी लोकांत पहावयास मिळतातः-
१) भविष्याचा विचार – दुरदृष्टी.
२) योग्य विचारांचे आचरण.
३) सातत्य.
४) पहिल्या तीन मुद्यांच्या आचरणात कुठलीच कसर सोडत नाहीत.

समुद्रभेट


काल समुद्र भेटीस गेलो होतो
अथांग समुद्र लाटा पसरुन पहुडलेला होता
बरीच जोडपी वाळूत बसुन स्वप्नशिल्पे साकारात होती
मीही काही शंख आणि शिंपले जमा केलीत
म्हटलं बनवेन सुरेखशी माळ तुझ्यासाठी
किंवा एखादा दागिना तुला सजवण्यासाठी
एक छोटंसं घरटंही बनवलं वाळूचंवाळूचं घरटं
म्हटलं तुला ठेवीन जपून तिथं
मग बराच वेळ फिरत होतो किनार्‍यावर एकटाच
तुझ्या सोबतीची स्वप्नपाखरे मनात उत्तुंग झेप घेत होती
एव्हाना गार वाराही वहायला लागला होता
मी डोळे बंद केले आणि तुला स्मरु लागलो
समुद्राच्या कॅनवासवर तुझी ठळक प्रतिमा उभरु लागली
तुझे मोकळे केस हवेत लहरी बनवत होते
तुझ्या गळ्यात मीच बनवलेली शिंपल्यांची माळ होती
आणि तु, मी बनवलेल्या वाळूच्या घरट्याच्या दाराशी बसुन
माझी मोठ्या आतुरतेने वाट पहात होतीस…….
अचानक पायाला गार पाण्याचा स्पर्श झाला
आणि डोळे उघडुन पाहतो तर काय?
एका लाटेने मी बनवलेलं वाळूचं घरटं केव्हाच गिळलेलं होतं
मी खुप बेचैन झालो, खुप हताश झाल्यासारखं वाटत होतं
आणि मनातली तुझ्या सोबतीची स्व्प्नपाखरेही
कुठेतरी विलुप्त झाली होती
निराश मनाने तसाच परतीच्या मार्गाला लागलो
तुला प्रत्य़क्ष भेटण्याची ओढ मनात घेऊन…….

तु नसताना सोबत माझ्या


आकाशात जेव्हा तांबड्या रंगाची झालर पसरते
तेव्हा तु आणि तुच मला आठवते
     नकळत माझी पावले चालू लागतात
     आपल्या जून्या भेटीच्या ठिकाणाकडे
एक वेडसर उमेद असते मनात तुला भेटण्याची
आणि भेटल्यावर तुला कवेत घेण्याची
     तिथे पोहोचल्यावर मात्र निरस होतो मनाचा
     एक उदासिनता पसरते चोहीकडे
मी खिन्न होऊन उभा असतो एकटाच
आणि अचानक नजर वळते आकाशाकडे
     माझ्या मनासारखेच ढगही भरुन आलेले असतात
     मग टपटप करुन अश्रु आणि पाऊसधारा ओघळू लागतात
तु नसताना सोबत माझ्या
पाऊसच देतो साथ मला
     अन बरसत राहतो आम्ही दोघे
     रुपेरी-चंदेरी आठवणींत तुझ्या…

मैत्रिच्या बांधावर



डोळ्यात तुझ्या, मैत्रिचा भास आहे
ह्रदयात मात्र, प्रीतीची आस आहे

     नजरेचे खेळ सारे, तु मांडते
     गुज मनीचे त्यातुन, अलगद उलगडते

हसण्याचे लाख बहाणे, तु शोधते
एकेक स्मित तुझे, मज घायाळ करते

     बोल तुझे लडिवाळ, ऐकून होतो मी स्तब्ध
     मी काय तुझ्याशी बोलनार, मी होतो निशब्द

सांगना एक दिवस, माझी तु होशिल का?
मैत्रिच्या बांधावर, प्रेमाचं रोप लावशिल का?

काल उघड्या धरतीवर


काल उघड्या धरतीवर
काळं आभाळ फाटलं होतं
जळाचा सुर्य, जळाचा दिवस
सारं वातावरण पावसाळलं होतं

भिजल्या अवस्थेत समुद्र
फारच उफाळला होता
पाहण्यासाठी किनार्‍यावर
उभा जनसमुदाय दाटला होता

वारा बेभान अश्वासारखा
इकडे-तिकडे धावत होता
मिळेल त्याला धक्के देऊन
वेग त्याचा दाखवत होता

दुर तिकडे क्षितिजाकडे
डोंगर सारे लपले होते
धुक्याआड आसरा घेऊन
पाऊस-गप्पा चघळत होते

काल उघड्या धरतीवर
काळं आभाळ फाटलं होतं
जळाचा सुर्य, जळाचा दिवस
सारं वातावरण पावसाळलं होतं

देव भेटला स्वप्नामध्ये


देव भेटला स्वप्नामध्ये
माग म्हणाला हवं ते

    मी मागितलं एक आभाळ
    हवं तेव्हा बरसणारं
    पोळताना रणरणत्या उन्हात
    गांर पाणी शिंपणारं

मी मागितला इंद्रधनू
हवं तसा रंगवणारा
फिकट, पुसट जीवनाला
रंग नवे देणारा

    मी मागितली एक पहाट
    हवी तेव्हा उगवणारी
    निराश, थिजल्या भावनांना
    आशेचा सुर्योदय दाखवणारी

मी मागितला एक दिवा
अंधार फोडून भडकणारा
तिमीर भरल्या वाटांवरती
प्रकाशझोत टाकणारा

    मी मागितलं एक घरटं
    हवं तेव्हा आसरा देणारं
    फिरताना या अनोळखी दुनियेत
    आपलेपणाचा दिलासा देणारं

मी मागितली एक सोबत
साथ नेहमी देणारी
हार असो वा जित असो
“पुन्हा लढ” म्हणनारी

    मी मागितलं एक गाणं
    हवं तेव्हा गुणगुणता येणारं
    सुख, दु:ख, प्रेम, द्वेष
    एका लयीत ऐकवणारं

मी मागितला एक आरसा
मला “मी” दाखवणारा
कुठून आलो? कुठे जायचे?
कधी विसरू न देणारा

सृष्टीचा आनंदोत्सव


   रविवारची दुपार आणि पावसाची हजेरी, मन रमायला आणखी हवे तरी काय? पाऊस धोधो बरसत होता आणि मी खिडकीबाहेर हात काढुन मिळतील तेवढे थेंब स्पर्शत होतो. चला आता उकाडा संपणार, सगळीकडे हिरवाई नटणार, म्हणुन खुप आनंद होत होता.
   मुंबईचा पाऊस असा खिडकीतुनच अनुभवायचा असतो, हे मला ठाऊक आहे. कारण भिजलोत तर उगाच सर्दि होईल आणि मग ऑफिसला गेल्यावर ए.सी. मधे आणखी उरलेल्या आजारांना निमंत्रण, म्हणुन मी मुद्दाम बाहेर जाऊन भिजणे टाळत होतो. पण त्याचवेळी गावाकडचा पाऊस आठवला…..
   गावांत असताना मी भिजण्यास भीत नसे. अहो पाऊस सुरु झाल्यावर उलट बाहेर हुंदडायला निघत असे. आणि गावच्या त्या पोषक वातावरणात सर्दि वगैरे काही होतच नसे. मग पाऊस ओसरल्यावर गावाबाहेरच्या डोंगराच्या पायथ्याशी जमुन आम्ही मित्र-मंडळी थंडी घालवण्यासाठी धुराचे लोट हवेत सोडायचो(वेगळे सांगणे नलगे).
   पावसाची अशी खरी मादकता गावाकडेच पहायला मिळते. पावसाच्या नशेत सारी सृष्टी धुंद होऊन नाचत असते. झाडे अंग झटकुन नव्या हिरवाईचा कोट चढवून वार्‍यासोबत आनंदाचा नाच करत असतात, बेडके डरावच्या एका लयीने निसर्गगीताला संगीत देत असतात, सारेच प्राणी-पक्षी पावसाच्या सादेला प्रतिसाद देऊन मदमस्त होऊन आनंद लुटत असतात. अशावेळी गावाकडचा माणुसही मग सार्‍या चिंता, मळभ, दु:ख आणि जबाबदार्‍या थोडा वेळ बाजुला ठेवुन सृष्टीच्या या आनंदोत्सवात सहभागी होत असतो. या आनंदोत्सवातुन त्याला एक नवीन ऊर्जा मिळते, जगण्याची, आनंदाने जगण्याची. निसर्ग करत असलेल्या या प्रेमाच्या उधळणीत हवं तेवढं प्रेम उपभोगुन गावाकडचा माणुस नवीन जबाबदर्‍या घेण्यास तयार होतो.
    पण मुंबईच्या माणसाला या सार्‍याची कदाचित माहितीही नसावी, तो फक्त त्याच्या जबाबदार्‍या आणि मिळकत यातच गुरफटलेला दिसतो. मग कधीतरी ह्या सार्‍याचा त्याला कंटाळा येतो, सर्व काही सहन करण्याच्या पलीकडे जाते आणि मग अशा वेळी त्याला निसर्गच आठवतो, मग तोही थोडा वेळ का असेना कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात दोन दिवस जाऊन येतो. एकुणच काय तर कळत-नकळत तोही ह्या सृष्टीच्या आनंदोत्सवात सामिल होतो.
   मग मी तरी का म्हणुन ह्या सृष्टीच्या आनंदोत्सवापासुन दुर राहुन खिडकीतुनच पाऊस अनुभवावा, म्हणुन मीही घराबाहेर पडलो आणि यथेच्छ भिजण्याचा आनंद घेऊ लागलो. आणि पावसाने मला मोठ्या खुशीने सृष्टीच्या ह्या आनंदोत्सवात सामिल करुन घेतले…

श्रद्धांजली (जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने….)


आज सुर्य उगवला
तोच मूळी मान झुकवून
या खितपत पडलेल्या पृथ्वीला
तो श्रद्धांजली वहात होता
शरमत होता तो
मानवाच्या दुष्कृत्यांमूळे
शिव्यांची लाखोली
तो आगीतून ओकत होता
ठार केले होते मानवाने
त्याच्या वसुंधरेला
तो गंध-सुगंधच तिचा
हरवून गेलेला होता
या सिमेंटच्या जंगलात तो
कोवळी पाखरे शोधत होता
चिवचिवाटाचा आवाज ज्यांचा
भिंतींमध्ये विरत होता
आठवत होता तो तिला
हिरवीगार, सुजलाम-सुफलाम
नजर त्याची झुकत होती
आता पाहुन सारे यंत्रगुलाम!

पाऊस : प्रेमाचा ऋतू


रिमझीम सरी पावसाच्या,
उत्तुंग भावना मनाच्या…

पाऊस हा प्रेमाचा ऋतू आहे. पहिला पाऊस गारव्यासोबत प्रेमाचे थंड वारेही आणत असतो. पावसाळ्यात बागेत जशी विविधरंगी फुले फुलू लागतात, तशीच बरिच ह्रदये प्रीतीचा रंग धरून नवी स्वप्ने बघू लागतात. ग्रीष्मात तापलेली पृथ्वी जशी पावसाने गार होऊ लागते, तशीच बरेच दिवस प्रेयसिच्या/प्रियकराच्या शोधात असणारे अचानक ते भेटल्याने हर्षून जात असतात. तिच्यासोबत/त्याच्यासोबत पावसात भिजणे हि एक सवय होऊन जाते. मग उगाचच भिजल्या अवस्थेत तिने रस्त्यावरच्या कांदा-भजीसाठी आग्रह धरावा आणि मग दोघांनी मुद्दाम एकच प्लेट कांदा-भजी शेअर करून खावी, असे गमतीदार खेळ सुरु होतात. तिच्या भिजल्या केसातुन येणारा सुगंध तो आयुष्यभरासाठी साठवून ठेवू पाहातो आणि अचानक कडाडलेल्या विजेला घाबरूण तिने त्याला मारलेली मिठी आणि त्या मिठीत सामावलेलं अभय तिही कुठेतरी मनाच्या कोपर्‍यात साठवू पहात असते.
असा हा प्रेमाच्या उगमाचा ऋतू तुमच्याही आयुष्यात असंच कुणीतरी “स्पेशल” घेऊन येवो हि सदिच्छा.
पहिल्या पावसाच्या अनेक शुभेच्छा.

आभास तुझा


सुप्तावलेली नजर माझी
आभास तुझा न्याहळत असते
पुष्पकळीसम लावण्य तुझे
स्वप्नकुपीत दडवत असते

सुवर्णछटा तुझ्या आठवणींच्या
ह्रदयात माझ्या चितारत असते
एकाकी मनास माझ्या
चित्रप्रदर्शन घडवत असते

नाहीस तु जीवनात माझ्या
आभास तुझा पुरेसा आहे
या चातकाला मृगजळाचा
थेंबही पुरेसा आहे

तरिही तु माझी व्हावीस
अशीच माझी इच्छा आहे
तुझ्या प्रेमाच्या श्रावणसरीत
चिंब मला भिजायचे आहे