प्रवासचक्र


असाच एकदा सकाळी गावाबाहेर फिरायला गेलो होतो.
कालच्या बर्‍याच कळ्या आज फुले झाल्या होत्या. गवतावर, पानांवर आणि पाकळ्यांवर सर्वत्र दवाचा सडा पडला होता. सुर्याची तांबूस किरणे त्या दवांवर पडल्यामुळे ते मोत्यांसम भासत होते.
मला अगदी प्रसन्न-प्रसन्न वाटत होते. भोवतालचा परिसर निरागसतेचा भाव आणत होता. सकाळीच अशी निसर्गाची मेजवानी मिळाल्याने विचार गहिरे होत गेले. कुठे सुरूवात झाली आपली? कसे जगलोत आजपर्यंत? आणि आजवरच्या प्रवासाने कुठे पोहोचलो आहोत आपण? निसर्ग आपले रूप क्षणाक्षणात बदलत असतो, आपणही बदललो आहोत का? ऊन, वादळ, पाऊस अन गारवा, निसर्गाची हि अविरत रूपे. आपला ह्या रूपांशी काही संबंध आहे का? हाही विचार मनात येवून गेला. आणि ह्या प्रश्नानेच आधीच्या सार्‍या प्रश्नांना उत्तरीत केले.

ऊनः
मी माझी सुरूवात माझा जन्म न समजता, मला जेव्हा कळायला लागले ती समजतो. आणि तो काळ म्हणजे १०वी-१२वीचा. नुकतच भोवतालचं जग खर्‍या अर्थाने कळायला लागलेलं असताना अचानक आलेलं १०वी-१२वीचं ओझं आणि जबाबदारी. आणि त्यात आलेलं अपयश. अशा सुरूवातीला मी ऊन म्हणेन.
आपल्या सुरूवातीच्या काळात असे किंवा ह्या प्रकारचे ऊन सगळ्यांनाच सोसावे लागते.

वादळः
त्यानंतर, ग्रॅज्युएशनच्या रूपाने माझ्या जीवनात एक वादळ आले. ह्या वादळात मी बराच वर उडालो आणि पुन्हा स्थिरावण्यासही बराच वेळ लागला. पण ह्या वादळातही मी स्वतःला सावरलं कारण, आधिच्या ऊन्हाने बरंच काही शिकवलं होतं.
अशा प्रकारची वादळेही ह्या न त्या रूपाने सर्वांच्याच आयुष्यात येतात.

पाऊसः
त्यानंतर माझं पी. जी. (पोस्ट ग्रॅज्युएशन). पावसाळा जरी ऊन्हाळ्यापेक्षा सुखद वाटत असला तरी धोधो पावसात धुतलं जानं बर्‍याचदा जिव्हारी येतं. आणि हो, अशा पावसात बर्‍याच गोष्टी धुतल्या जात असतात. आपण आपले जुने रूप सोडून एका नविन चेतनेत जातो.
असा पाऊसही बर्‍याच जणांनी अनूभवला असेल.

गारवा:
हा सुखाचा ऋतू. मला नोकरी लागली. एवढ्या दिवसांची वणवण फळाला आली. सर्वत्र सुख आणि आनंद.
तिखट ऊन्हाने झालेली सुरुवात गारव्यापर्यंत पोहोचल्यावर मनात येवून गेले की हा ऋतू संपूच नये. पण असे होईल? निसर्गतःच उत्तर येते, “नाही”.

आपण जर निसर्ग आणि जीवन यांचा सारासार विचार केला तर बरिच कोडी उलगडतात. आणि मला आत्ताच उलगडलेले कोडे म्हणजे:
आपले आयुष्य हे ऊन, वादळ, पाऊस आणि गारवा ह्या चक्रातून जात असते. फक्त ज्याच्या-त्याच्यासाठी ह्या ऋतूंचे प्रमाण/कालावधी वेगवेगळे असू शकतात. आणि हो, आधीच सांगितल्याप्रमाणे हे चक्र आहे. कुठलाच ऋतू हा स्थिरस्थावर असणार नाही. ते चक्र आहे आणि ते फिरतच रहाणार.

सकाळचं ऊन आता बरंच वर आलं होतं. आणि गवतावरचे दवबिंदूही गायब झाले होते. मनातिल सारी विचारचक्रे थांबवून मी माघारी घराकडे वळालो.

आठवणींची फूले


किणकिणते ऊन झरोक्यातले,
आभाळातून अवतरलेले,
वाऱ्या पावसातही उभा ठाकलेला,
तो मातीचा महाल,

दारासमोरचे निंबाचे झाड,
अविरत सावली देणारे,
असंख्य पाखरांचा विसावा,
तो हिरवाकंच पंडाल,

मनास पार पोखरते,
हि आजची रिकामी जागा,
आठवणींच्या फूलांनी नटलेला,
हा कळकट जूनाट धागा,

बालपणीचे खेळ गुंजतात,
आजही माझ्या कानात,
अश्रूंचे मोती उताविळ,
या मातीच्या शिंपल्यात जाण्यास.

नव्या जगाची वाट पहातो आहे


नव्या जगाची वाट पहातो आहे,
मी काळोखाशी लढतो आहे,
स्फुरलेल्या श्वासाची रणशिंगे,
मी कधीच पूकारली आहेत,
प्रयत्नांच्या तलवारीचा झंझावाद,
यशाच्या शिखरासाठी खणाणतो आहे,
अपयशाची काढण्या लक्तरे,
मी उद्विग्न आहे.

बरसात


बादलो में चाँद फिरसे छिपने लगा,
न जाने कैसा दर्द सिने में उठने लगा,
फिर एक बार अँधेरी रात होगी,
आज शायद फिरसे तनहा ये बरसात होगी,
तू दूर इतना चला गया है साथी,
फिरभी न जाने क्यों तुम्हारी याद है आती,
हम आजभी बारिश में भीगते रहते है,
हमारे आंसू जो दुनियासे छीपाने है हमें.

स्वल्पविराम


हरवलेल्या वाटेवरचं,
वेड़ंवाकड़ं गांव,
मला दिसलं,
आणि जवळचचं ते झोपड़ं,
मला पाहून हसलं.
अठराविश्व दारिद्र्य त्याचं,
मला खुणावत होतं,
हे गांव सुद्धा,
माझ्या ध्येयाचं तिमीर नव्हतं.
माझी वाट अजुन,
संपली नव्हती,
थकलो होतो थोडा,
पण माझी ध्येयगाठ अजुन
सुटली नव्हती.